मुअम्मर गद्दाफी (Muammar Gaddafi) हा एक असा महत्त्वाकांक्षी हुकूमशाहा होऊन गेला ज्याने देशाची तहान भागवण्यासाठी वाळवंटात २८२० किमीची मानवनिर्मीत नदी तयार केली. हा कारनामा इतका आव्हानात्मक होता की याची चर्चा संपुर्ण जगभरात झाली. (Man Made River)

मुअम्मर गद्दाफी हे लिबीया देशाचे सर्वोच्च नेते होऊन गेले. लिबीया (Libyan) हा देश आफ्रीका खंडाच्या उत्तरेत सहारा वाळवंटात आहे. या देशाचा ९९ टक्के भाग हा वाळवंटात आहे. उपग्रहाच्या मदतीने जरी बघितले तर लिबीयात कुठेही हिरवळ दिसणार नाही. या देशात १०-१० वर्ष पाऊस पडत नाही. त्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे.

या देशात जितके पाण्याचे दुर्भिक्ष आहे तितकेच मुबलक खनिज तेल उपलब्ध आहे. अमेरिकेपेक्षा लिबीयामध्ये जास्त खनिज तेल आहे. १९५० मध्ये खनिज तेल काढण्याचे काम सुरू असतानाच अचानक जमिनीतून पाणी येऊ लागले. हे गोडे पाणी असल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. याआधी वाळवंटात असे गोडे पाणी लागले नव्हते. हे पाणी १०० वर्ष टिकेल इतके होते. ही गोष्ट हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांना कळताच त्यांनी या पाण्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी करण्याचे ठरवले.

जिथे पाण्याचे साठे लागले होते तो भाग लिबीयाच्या दक्षिणेत होता. तर लिबीयाची मुख्य शहरं उत्तरेत होती. मुअम्मर गद्दाफी यांनी दक्षिणेतील हेच पाणी उत्तरेत नेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी मानवनिर्मीत नदी बनवण्याची घोषणा केली. ही घोषणा करणे जितके सोपे होते तितकेच हा प्रकल्प प्रत्यक्षात राबवणे कठीण होते.

दक्षिणेतून पाणी उत्तरेत घेऊन जाण्यासाठी २८२० किमी लांबीची नदी खोदावी लगणार होती. इथे आणखी एक आव्हान असे होते की, ही नदी सामान्य नदी सारखी खुल्या पद्धतीने घेऊन जाता येणार नव्हती. कारण येथील उष्णता इतकी आहे की येथे जमिनीवर पडलेल्या पाण्याचे काही क्षणातच बाष्पीभवन होते. त्यामुळे खुल्या पद्धतीने पाणी नेल्यास या पाण्याचे शहरापर्यंत पोहचण्या आधीच बाष्पीभवन होण्याचा धोका सर्वाधिक होता. यावर उपाय म्हणून मुअम्मर गद्दाफी यांनी हे पाणी बंद पाईप लाईनद्वारे जमिनी खालून शहरांपर्यंत आणण्याचे ठरवले.

या प्रकल्पासाठी १३ फुट रुंद आणि ८० टन वजनाचे असे ५ लाख पाईप बनवण्यात आले. हे पाईप स्टील आणि काँक्रीटचे होते. हे पाईप बनवण्याचे कारखाने लिबीयात उभारण्यात आले. १९८० मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. यावेळी आणखी एक आव्हान असे होते की, लिबीयात रोड नेटवर्क नव्हते. त्यासाठी दक्षिण कोरीयातील एका कंपनीकडून रस्ते बनवून घेतले.

कारखान्यात बनवले गेलेले पाईप २० फुट खोल जमिनीत गाडण्यात आले. हे काम फक्त फेज १ चे होते, असे ५ फेज बनवण्यात येणार होते. फेज १ साठी ५ बिलियन डॉलर इतका खर्च करण्यात आला. १९८९ मध्ये फेज २चे काम सुरू करण्यात आले. या फेजमध्ये लिबीयाची राजधानी ट्रीपोली येथे पाणी वाहून नेण्यात आले. यासाठी जबल हासुना येथे दोन विहीरी खोदण्यात आल्या आणि २०० मीटर खोलीवरुन पाणी पंपाद्वारे उचलण्यात आले.

या प्रकल्पाच्या ३ फेजचे काम अतिशय जलद गतीने झाले. यामध्ये ५ रिझर्व तलाव देखील खोदण्यात आले. या तलावांची रुंदी १ किलोमीटर इतकी आहे. या संपुर्ण प्रकल्पाला २५ बिलीयन डॉलर इतका खर्च आला. विशेष म्हणजे हा सर्व खर्च कोणाचेही कर्ज न घेता करण्यात आला.

या प्रकल्पामुळे देशाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, शिवाय वाळवंटात शेतीदेखील होऊ लागली. या संपुर्ण प्रकल्पाची चर्चा जगभरात होऊ लागली. याला जगातले आठवे आश्चर्य म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र २०११ मध्ये सुरू झालेल्या सिव्हील वॉरमध्ये या प्रकल्पाचे नुकसान झाले. नाटो देशांनी केलेल्या हल्ल्यात फेज ४ आणि ५साठी बनवण्यात येणाऱ्या पाईपांचे कारखाने उडवण्यात आले. याच युद्धात मुअम्मर गद्दाफी यांची हत्या झाली. त्यानंतर प्रकल्पाचे काम रखडले.

सध्याच्या घडीला देखभाली अभावी हा प्रकल्प ठप्प पडला आहे. ज्या शहरांना पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जायचा तोही आता बंद झाला आहे. मात्र मुअम्मर गद्दाफी यांच्या या प्रकल्पाची चर्चा अजूनही होत आहे.

हे पण वाचा
अद्भुत आहे या माणसाच्या पोटाची रचना, संपुर्ण विमान खाल्ले तरी पचले
विमान हवेत असताना पायलटला रस्ता कसा समजतो ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *