लेखक -: श्री.नंदकुमार पाटील ,बांबवडे शिराळा ( सांगली )

(शहरामध्ये उद्भवत असलेल्या एका समस्येवर प्रकाश टाकणारी कथा)

नरेशने काका-काकू, मामा-मामी आणि बहिण नंदा यांना मेसेज पाठवला “मी आई-बाबांना वृद्धाश्रमात ठेवले”.

नरेश हा आई-बाबा, नंदा आणि सर्व नातेवाईकांच्या मते वाया गेलेला मुलगा. त्याच्या उनाड मित्रांबरोबर भटकणारा, कधी-कधी सिगारेट, दारू घेणारा, एकूणच बिघडलेला. कोणीही त्याच्याशी बोलत नव्हते, अगदी आई-बाबाही कामापुरतेच!

नरेशने तीन वर्षांपूर्वी सुरेखाबरोबर रजिस्टर पद्धतीने प्रेमविवाह केला. सर्वांना मेसेज पाठवला होता. कोणी येण्याची शक्यता नव्हतीच. आई-बाबाही नाईलाजाने उपस्थित होते. गेल्या वर्षी त्यांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. फोन कोणीही घेणार नाही हे माहीत असल्याने मुलाच्या बारशाला त्याने सर्वांना मेसेज पाठवला. कोणीही आले नाही. म्हणून त्याने आज आई-बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्याचा मेसेजच पाठवला.

दोन दिवसांनी एकापाठोपाठ काका, मामा व नंदा यांचे मेसेज आले “आम्ही रविवारी येतोय”. नरेश मनाशी हसला. चला, तयारीला लागूया.
रविवारी संध्याकाळी काका-काकू, मामा-मामी आणि नंदा एकत्रच आले. नरेश मनाशीच म्हणाला, म्हणजे हे सर्व एकमेकांशी बोलून, ठरवूनचं आलेत तर. हेही बरे झाले.
सुरेखाने सर्वांना पाणी दिले. पाणी पिता-पिता नंदाने घरावर नजर फिरवली. हॉल छोटा असूनही वहिनीनं चांगलाच सजवलाय. हं, घरीच असते म्हणून.
तेवढ्यात काकांनी विषयाला हात घातला, “अरे, तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. ज्यांनी तुला कष्ट करून लहानाचं मोठं केलं त्यांना तू वृद्धाश्रमात ठेवलस.” एवढे बोलेपर्यंत त्यांचा चेहरा लाल झाला.

मामांनी री ओढली, “उतारवयात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, ते सोडून तू आई-बाबांना वृद्धाश्रमात टाकलस. अरे, या वयात त्यांना प्रेमाची, मुलांची गरज असते.”

नंदाने आपला राग बाहेर काढला, “एवढं होतं तर वहिनीला नोकरीला पाठवना, चांगली शिकलेली, कॉम्पुटर प्रोगामर आहे की.”

बहुतेक सर्वांच बोलून झाले होते. नरेशने सुरुवात केली.

“माझ्या जन्माच्या आधीपासून आई-बाबा नोकरी करतायत. साधारण एक वर्षाचा असल्यापासून मला पाळणाघरात ठेवायला लागले. माझ्या संमतीचा प्रश्नच नव्हता. पुढे मला जसं थोडं समजायला लागलं तसं मला नेहमी आई जवळ असावी, आई बरोबरच रहावं ही इच्छा मनात घर करून राहिली आणि दिवसेंदिवस ती प्रबळ होत गेली. सकाळी बाबा शाळेत सोडायचे, तिथून बसने पाळणाघरात आणि रात्री घरी असं माझं बालपण गेलं. शाळेत माझ्या काही मित्रांना त्यांची आई घ्यायला यायची. किती आनंदाने ते जाऊन आईला बिलगत होते! ते पाहून मला त्यांचा खूप हेवा वाटायचा. मला जे सुख मिळत नाही ते त्यांना मिळताना बघून पुढे-पुढे मला त्यांचा राग यायला लागला.

काका, लहानाचा मोठा मी पाळणाघरात झालो. फक्त झोपण्यापूर्त मला घरी आणलं जायचं. मी आईचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडत होतो पण माझ्या वाट्याला ते आलचं नाही.
मला नेहमी वाटायचं आईने मला जवळ घेऊन बसावं, तिच्या मांडीवर बसून मी खेळाव, तीने माझ्याबरोबर खूप हसावं, खेळावं. पण आईला “वेळ” नव्हता. ज्या वयात मला काहिही समजतं नव्हतं, आई-बाबा हेच माझं विश्व होतं, आई-वडिलांची मला गरज होती, त्या वयात मला पाळणाघरात ठेवलं गेलं. काय फरक आहे हो पाळणाघरात नि वृद्धाश्रमात? तुम्ही त्याला कितीही गोंडस नाव दिलत, पाळणाघर, बेबी-सिटर वा आणखी काहीही, तरी माझ्या दृष्टीने तो “बालाश्रम”च आहे. जसा वृद्धाश्रम तसाच हा बालाश्रम. माझ्या भावनाही मला व्यक्त करत्या येत नव्हत्या अशा वयात मला आई-वडिलांची, त्यांच्या आधाराची जास्त गरज होती, त्यावेळी मला त्या बालाश्रमात डांबलं गेलं. त्यावेळी तुम्ही कोणी आला नाहीत बोलायला.”

सगळेजण गप्प होते. नरेश पुढे म्हणाला, “मला जसं समजायला लागलं तस मी घरी आल्यावर आईने मला भरवाव म्हणून हट्ट करू लागलो की जेणेकरुन आई मला जवळ घेऊन मांडीवर बसवून भरवेल. पण उलट मला मार मिळायचा. आईला तिची कामं असायची. मलाच हाताने खायला लावायचे. एकदा मी आजारी पडलो, ताप होता. त्यावेळी आईने सुट्टी घेतली, मला खूप आनंद झाला. आता दिवसभर आई आपल्याला मिळेल. पण छे, फक्त औषध देण्यापुरत ती माझ्याजवळ आली नंतर घरातली राहिलेली कामं करायला गेली. मला खूप राग आला पण एक समजलं, आजारी पडलं की आई सुट्टी घेते. मग मी मुद्दाम आजारी पडायला लागलो. पण सुट्टी घेउनही आई वा बाबा माझ्या वाट्याला जास्त आलेच नाहीत. ते त्यांच्या कामातच मग्न, कधी घरची तर कधी ऑफिसमधून आणलेली. माझी आई-प्रेमाची भूक दिवसेंदिवस वाढतच होती आणि त्यातूनच माझं अभ्यासातील लक्ष कमी होऊ लागलं.

मार्क कमी पडू लागले आणि मला वाटलं आतातरी आई-बाबा माझ्या बरोबर बसून माझा अभ्यास घेतील. त्याऐवजी त्यांनी मला ट्यूशन लावली. आतातर आई-बाबांचा सहवास फक्त रात्री जेवणापुरताच मिळू लागला. आई-बाबांचं लक्ष आपल्याकडे कसे वेधता येईल याभोवतीच माझं लक्ष केंद्रित होऊ लागलं. एके दिवशी रस्त्यात पडलेला सिगारेटचा तुकडा मी उचलून डब्याच्या पिशवीत ठेवला. रात्री आईने तो पाहिला, मला वाटलं आता तरी दोघेही मला जवळ घेऊन माझ्याशी बोलतील आणि मग मी त्यांना खरं ते सांगेन. मला मिळाला फक्त मार आणि सज्जड दम. त्यावेळी मला समजलं आई-बाबा यांच्या विश्वात मला स्थान नाही आणि ज्या प्रेमासाठी माझं मन आसुसल आहे ते मला मिळणार नाही. त्यांची बोलणी आणि मार नेहमीचा झाला आणि मी कोडगा बनत गेलो.

थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. काकू प्रथमच बोलल्या, “अरे, त्यांच्या भावनांचा तरी विचार करायचास, त्यांना काय वाटलं असेल आणि समाज काय म्हणेल याचा तरी विचार कर”.

नरेश उसळून म्हणाला, “वृद्धाश्रमातील वृद्धांच्या भावना तुम्हाला दिसतात पण ज्या बछड्यांना नीट बोलताही येत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत, त्यांना भावना नाहीत? वृद्धांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसतात आणि त्या कोवळ्या लहानग्यांच्या डोळ्यातून वाहणारे पाट तुम्हाला दिसत नाहीत? आईसाठी ते रडले तर त्यांना मारून, आमिष दाखवून बालाश्रमात डांबतात आणि समाज गप्प रहातोय, वा रे समाज !

काका समजावणीच्या सुरात म्हणाले, “अरे, दोघांनी नोकरी करणं गरजेचं होतं. त्यामुळे पाळणाघरात ठेवणं गरजेचं होतं.”
नरेश उत्तरला, “त्यावेळी त्यांना गरज होती म्हणून त्यांनी मला बालाश्रमात ठेवलं, आज माझी गरज आहे म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं”.

काही काळ निरव शांततेत गेला. नरेशने सुरेखाला काही खूण केली, त्याबरोबर तिने जाऊन बेडरूमच्या दरवाज्याची कडी काढली आणि . . . हुंदके देत आई बाहेर आली आणि नरेशचं मस्तक छातीशी धरुन त्याचे पटापट मुके घेऊ लागली. या अनपेक्षित झालेल्या वात्सल्याच्या वर्षावाने क्षणभर नरेश गोंधळला, अखेर त्याचाही बांध कोसळला आणि दोघांच्याही डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा आणि यमुनेचा संगम होऊन त्या पुरात ते चिंब भिजले. त्या दोघांना वेगळं करण्याची हिम्मत कुणाकडेच नव्हती. बाबाही हळूच येऊन जमिनीकडे बघत सोफ्यावर बसले. एकच क्रिया ते सतत करत होते, डोळ्यांना रूमाल लावणे. थोड्यावेळाने नरेश भानावर आला आणि त्याने आईला हाताला धरून सोफ्यावर बसवले.

नरेश म्हणाला, “नंदा, तू म्हणते सुरेखाला नोकरीला पाठव. मी जे भोगलं तेच आमच्या मुलाच्या वाट्याला आम्ही येऊ देणार नाही. संसारगाड्याची दोन चाके आहेत, एक अर्थार्जन आणि दुसरे घर. दोघांनीही नोकरी केली की रोज दोघांचीही धावपळ, कामाचा तणाव यात दोघांनाही ना मुलाकडे ना आई-बाबांकडे लक्ष देता येणार. त्यातून होणारी चिडचिड, नैराश्य यामुळे बिघडलेलं सर्वांच आणि पर्यायाने घराचं स्वास्थ. या सर्वांचा विचार करून लग्नाआधी आम्ही बोललो आणि ठरवलं की एकाने अर्थार्जन करायचे आणि एकाने संपूर्ण घर आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचे. आणि महत्वाचे म्हणजे मला माझ्या मुलाला बालाश्रमात ठेवायच नाहीये. आई-बाबा थकलेत आणि त्यांच्यावर मला मुलाची जबाबदारी सोपवायची नाही. आजपर्यंत ते इच्छा मारूनच जगले, आता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे राहू द्यायचय. आज संसाराच्या गाड्याच एक चाक, घर, सुरेखा पूर्णपणे सांभाळत असल्यानेच मी माझ्या कामात निर्धास्तपणे झोकून देऊन कामामध्ये नविन जबाबदाऱ्या घेऊन यशस्विरित्या पार पाडू शकलो. आणि त्यामुळेच गेल्या महिन्यात मला मार्केटींग मॅनेजर पदावर बढती मिळाली.”

नरेशने आतून पेढ्याचा बॉक्स आणला व स्वतःच्या हाताने आईला पेढा भरवला. नंतर बाबांच्याही खांद्यावर हात ठेवून त्यांनाही पेढा भरवला आणि मग सर्वांना पेढे दिले.
काका म्हणाले, “पण तू हे सर्व नाटक कशासाठी केलं”.
नरेश हसला आणि म्हणाला, “सुरेखा खूप दिवसांपासून म्हणत होती, एकदा सर्वांना बोलवून मनातील गैरसमज दूर करा आणि तुम्ही खरंच कसे आहात ते सर्वांना कळू द्या. मी बोलावलं असतं तर तुम्ही कुणीच आला नसता. म्हणून हे करावं लागलं”.

मामी म्हणाल्या, “खरंच तू आज आमचे डोळे उघडलेस आणि नरेश व्यसनी नसून एक जबाबदार मुलगा आहे हेही समजलं”.
नरेश हसत म्हणाला, “आजचा समाज हा स्वतःभोवती आणि पैशाभोवती केंद्रित झालाय, तो जर कुटुंबाभोवती केंद्रित झाला तर आजच्या समाजातले कित्येक प्रश्न आपोआप सुटतील. आणि मामी, मला व्यसन असं कधी नव्हतंच, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला तो एक प्रयत्न होता”.

नरेशने आईकडे पाहिलं, अजूनही ती हुंदके आणि उसासे यातून सावरली नव्हती. नरेश आईजवळ गेला आणि त्याने आपले हात आईच्या गळ्याभोवती गुंफले आणि म्हणाला, “आज मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे, आज मला माझी आई मिळाली”.

या लेखातून काही बोध मिळतो का ते पहा. संसार सुखाचे होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *