लेखिका :- रूपाली अनिल साखरे
त्या उजाड टेकडीवर
अवचित दिसली हिरवळ
चाफ्याचा मनी दरवळ
असेल का हे मृगजळ….?
येता येता दिसलेली ती टेकडी तिला साद घालत होती चार ओळी लिहिल्यानंतर घोंगावणाऱ्या आठवणींमध्येच ती निद्राधीन झाली. दुसऱ्या दिवसाचा सूर्य वेगळ्याच रंगात उगवता झाला.
जाता जाता त्याची नजर भिंतीवर लावलेल्या त्या फ्रेम वर खिळून राहिली.
” काय झालं डॉक्टर साहेब काही राहिलं का”?
“अ… हो… नाही…चला…”!
“साहेब… डॉक्टर साहेब आले आहेत.”
“हॅलो , नमस्ते ….मी रणजीत देसाई ही माझी पत्नी सुचित्रा, चार दिवस झाले तापाने फणफणली आहे.”.
नाडी तपासताना डॉक्टरांचेच हात गार पडले होते. सुचित्रा ग्लानीमध्ये होती.
डॉक्टरांनी स्वतः जवळची काही औषधे दिली आणि पुन्हा चार दिवसांनी तपासणीसाठी येऊन जाईल असे सांगत रवाना झाले.
सेवा परमो धर्म हा: असे म्हणत पावलं पुन्हा देसाईंच्या घराकडे वळली.
“महादू बाईसाहेब आहेत का.”?
“नाही साहेब आत्ताच समोरच्या टेकडीवर गेल्या आहेत.”
“अरे पण बरं वाटतंय का त्यांना.
महादू उत्तर देईपर्यंत डॉक्टर साहेब गाडीत बसले सुद्धा.
ही सांज मात्र काहीतरी वेगळेच सोबत घेऊन आली आहे विचारांच्या चक्रात गाडी टेकडीच्या पायथ्याशी थांबली.
झपाझप पावलं टाकत डॉक्टर साहेब त्या मंदिराच्या कठड्यावर पाठमोऱ्या तिला पाहून काहीसे थबकले.
“ये राघव तुझीच वाट पाहत होते”. वाऱ्याने जणू राघवच्या येण्याची वर्दी तिला आधीच दिली होती.
“सूची काय हे , किती वर्षांनी आणि अशी भेट होईल आपली असं वाटलं ही नव्हतं.
जाता जाता सहजच म्हणून रेखाटलेली ही टेकडी तू तर तुझ्या घरात इतक्या वर्षांनी जपून ठेवलीस कशासाठी…?
“तेव्हाची ही उजाड टेकडी कधीतरी फुलेल बहरेल या आशेवर किती वर्ष होते मी. तिच्याप्रमाणे तुझ्या मनात कधी हिरवळ दाटलीच नाही. मी तेव्हा बोलले नाही पण तुला कळलं नाही कारे राघव..?
“सगळं सांगायच्या आधीच तू भुरकन निघून गेलीस सूची दोघांमधली कधीही न भरणारी परिस्थितीची दरी आड आली, प्रेमाच स्वप्न मलाही पडलं होतं. पण हात बांधलेले होते.”
आता मात्र तिचा बांध फुटला उजाड माळरानी आठवणीचे शिंतोडे पडले. तिला सावरण्यासाठी राघवणे हातात घेतलेला हात तिने पटकन काढून घेतला.
“अरे माझं लग्न झालंय मला दोन मोठी मुलं आहेत तुझेही झालं असेल, भावनांना आवर घालता यायला हवा. रणजीत बरोबर मी खूप सुखी आहे. रणजीतच्या बदलीसाठी आम्ही इथे आलो.”
” हे बघ टिपिकल बाई सारखं बोलू नकोस. दोन मित्र मैत्रिणी भेटले तर त्यात कसलं पाप ? माझंही लग्न झालंय जे झालं ते मागे सोडून आपण मैत्रीची रुजवात करू शकत नाही का ?
“आणि अगं काय तुझी अवस्था करून घेतलीस, कशी होतीस कॉलेजला एकदम टॉम बॉय, आणि त्या दिवशी तुला पाहिलं आणि अवाक् झालो, खरंतर त्यासाठी भेटायचं ठरवलं आता मुलांच सगळं मार्गी लागलेलं दिसतंय. तुझ्या स्वप्नांसाठी जग,अशी कोमेजून जाऊ नकोस, रणजीतच्या सोबतीने पुन्हा स्वतःच स्वप्न साकार कर”.
कलत्या सूर्याने रंगांची उधळण केली. उजाड माळरानही रंगीबेरंगी भासू लागलं. नव्या उत्साहात ती स्वप्नात नवे रंग भरून घराकडे निघाली.
रात्री रणजीतच्या कुशीत शिरताना स्वप्नात हिरवळ भरली.
डॉक्टरांच्या हस्ते कलाकारी ही पाटी लागली.